ट्रॅन्क्विलाईझ करून केले बेशुद्ध; वनविभागाच्या धाडसी मोहिमेनंतर हजारो गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा श्वास
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपूर बफर परिक्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून प्रचंड दहशत माजविणाऱ्या आणि तब्बल चार शेतकऱ्यांसह शेतमजुरांचा जीव घेणाऱ्या नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर मोठे यश आले आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अत्यंत शिताफीने राबविलेल्या एका शोध मोहिमेदरम्यान या नर वाघाला ‘ट्रॅन्क्विलाईझ’ (बेशुद्ध) करून जेरबंद करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे चंद्रपूर बफर क्षेत्रातील शेकडो गावकऱ्यांनी आणि धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर बफर वनपरिक्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली होती. जंगलाला लागून असलेल्या शेतांमध्ये काम करताना चार वेगवेगळ्या नागरिकांना वाघाने ठार केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे व भीतीचे वातावरण होते. या वाढत्या हल्ल्यानंतर वनविभागाने परिसरात तात्काळ हायटेक ट्रॅप कॅमेरे लावले. या कॅमेऱ्यांमधील फुटेज आणि वाघाच्या अंगावरील पट्ट्यांचे विश्लेषण केले असता, चारही वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मनुष्यहानीच्या घटनांमागे ‘टी-८७’ नावाचा एकच नर वाघ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले.
२१ मे रोजी रात्री वनविभागाला पेठ-२ नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ६२१ पीएफच्या जंगलात ‘टी-८७’ वाघाचे लोकेशन मिळाले. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका आर. वेलमे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे आणि डॉ. कुंदन पोडचेलवार यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने रात्रीच्या अंधारातच जंगलाला वेढा दिला. वाघाची हालचाल टिपून पथकातील शार्प शूटर अजय मराठे यांनी अंधारातही अत्यंत अचूक निशाणा साधत वाघाला गुंगीचे इंजेक्शन (डार्ट) मारले. काही वेळातच वाघ बेशुद्ध झाल्यानंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
ही अत्यंत संवेदनशील आणि धाडसी कारवाई ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल, उपसंचालक (बफर) लेफ्टनंट कुशाग्र पाठक, आणि सहायक वनसंरक्षक एस. यु. वाठोरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाईत क्षेत्र सहायक ए. आर. बेग, एस. टी. टेकाम, पी. टी. रामटेके, वनरक्षक डी. एस. जाधव, एन. एस. ठाकरे, जी. डी. वरखडे, आर. के. मोहुर्ले, ए. यु. चुधरी, एस. एम. सोनकांबळे, व्ही. पी. भिमनवार यांच्यासह ताडोबाची ‘आरआरटी’ (Rapid Rescue Team) आणि चंद्रपूर बफरची ‘पीआरटी’ (Primary Response Team) चमू सहभागी होती.
जेरबंद केलेल्या या नर वाघाला आता वैद्यकीय तपासणीसाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, त्याच्या पुढील पुनर्वसनाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. या कामगिरीबद्दल चंद्रपूरच्या नागरिकांनी वनविभागाचे आभार मानले आहेत.





