गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई !
नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; मोठ्या प्रमाणात स्फोटके व साहित्य जप्त !गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई !
नागपूर : (ता.२३) गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असतानाच पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत जंगलातील गुप्त शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिनागुंडा परिसरातील जंगलात शोधमोहीम राबवून ही कारवाई केली.
१६ मे रोजी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत कंपनी क्रमांक १० व इतर दलममधील पाच नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. चौकशीदरम्यान त्यांनी जंगल परिसरात स्फोटके व शस्त्रनिर्मिती साहित्य लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली.
यानंतर पोलिसांनी बिनागुंडाच्या जंगलात शोधमोहीम राबवली असता मोठ्या प्रमाणात साहित्य आढळून आले. यात लेथ मशिन, १२ बोअर पाईप, बीजीएल पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटऱ्या, ग्राइंडिंग व ड्रिलिंग मशिन, जिग सॉ मशिन, प्रेशर पंप, सोलर पॅनल तसेच स्फोटक साहित्याचा समावेश होता.
पोलिसांनी जप्त करण्यात आलेले साहित्य घटनास्थळीच नष्ट केले. या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या घातपाती कारवायांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
गडचिरोली पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून जिल्ह्यात शांततेकडे वाटचाल अधिक वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे.





