ज्वाला न्यूज
मंगेश बन्सोड
गडचिरोली | प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ सी (आलापल्ली–आष्टी मार्ग) वर सुरजागड लोह प्रकल्पाशी संबंधित जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून, या वाहनांच्या वाढत्या वेगामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दिपक उर्फ शंकरराव मुंगनकर यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, या मार्गावर अनेक गावे, शैक्षणिक संस्था, बाजारपेठा तसेच दैनंदिन वर्दळ असलेली ठिकाणे आहेत. अशा परिस्थितीत भरधाव वेगाने धावणाऱ्या जड वाहनांमुळे शाळकरी विद्यार्थी, दुचाकीस्वार, पादचारी आणि इतर वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रमुख मागण्या :
सुरजागड लोह प्रकल्पाशी संबंधित जड वाहनांसाठी स्वतंत्र वेगमर्यादा निश्चित करून ती जाहीर करावी.
संवेदनशील ठिकाणी वेगमर्यादा दर्शविणारे फलक लावावेत.
स्पीड गन, सीसीटीव्ही व इतर तांत्रिक साधनांद्वारे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.
वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर दंडात्मक कारवाई करावी.
रात्रीच्या वेळेस विशेष तपासणी मोहीम राबवावी.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी नियमित वाहतूक तपासणी व जनजागृती अभियान सुरू करावे.
नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी हा गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाचा मार्ग असून या मार्गाच्या उन्नतीकरण व विकासाची कामे विविध टप्प्यांत सुरू आहेत.





