ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
नागपूर:
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या ४० वर्षांपासून लागू असलेली दारुबंदी उठवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे. या मागणीवर चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आत्राम यांच्या या मागणीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही आपले समर्थन दिले आहे.
आत्राम यांनी मांडलेली भूमिका:
पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर आत्राम यांनी दारुबंदीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “गेल्या ४० वर्षांपासून जिल्ह्यात दारुबंदी असूनही काहीही साध्य झालेले नाही. वर्धा जिल्ह्यातही दारुबंदी असताना तिथे मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते.” गडचिरोलीत आता उद्योग आणि रोजगारनिमिर्ती होत आहे, त्यामुळे दारुबंदी कायम ठेवून उपयोग नाही, असे त्यांनी नमूद केले.
आदिवासी संस्कृतीचा उल्लेख करत आत्राम म्हणाले, “आदिवासींना महागडी दारू विकत घ्यावी लागते. त्यापेक्षा मोहाच्या दारूला कायदेशीर दर्जा द्यावा. आदिवासी संस्कृतीत जन्म, लग्न आणि मृत्यूच्या वेळी मोहाची दारू पिण्याची परंपरा आहे”.
विजय वडेट्टीवार यांचे समर्थन:
या मागणीला पाठिंबा देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “मी चंद्रपुरातील दारूबंदी उठवली होती. जगात अनेक ठिकाणी दारू विक्री सुरू आहे. ज्या राज्यांनी दारूबंदी केली, त्यांनाही ती नंतर उठवावी लागली.” दारुबंदीमुळे माणूस व्यसनमुक्त होत नाही, असे सांगत त्यांनी या चर्चेला ‘फालतू चर्चा’ असे संबोधले. विकसित देशांमध्ये अशा गोष्टींना मोकळीक असल्याचे सांगत त्यांनी आत्राम यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.





