पत्रकार: मंगेश बन्सोड
चंद्रपूर :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह संपूर्ण चंद्रपूर शहरात शिगेला पोहोचलेला असताना, गांधी चौक परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरवणुकीतील गर्दीत झालेल्या किरकोळ धक्काबुक्कीचे रूपांतर वादात होऊन एका ३६ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात विविध विहारांतून भव्य रॅली काढण्यात आली होती. रात्री ११:३० च्या सुमारास इंदिरा नगरमधील ‘भीमरत्न बहुउद्देशीय युवा संस्थेची’ रॅली गांधी चौकात पोहोचली. यावेळी डीजेच्या तालावर तरुण नाचत असताना दोन गटांत किरकोळ धक्काबुक्की झाली. या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले.
यावेळी रविकांत टेम्बुरकर (३६ वर्षे) यांनी मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या तरुणांनी रविकांत यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात रविकांत गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. याच हल्ल्यात अनिकेत गलबले नावाचा दुसरा एक युवकही जखमी झाला आहे.
पोलीस प्रशासनाची कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी एका आरोपीला जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकूण ५ जणांना अटक केली आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
चंद्रपूरच्या इतिहासात जयंती उत्सवाला अशा प्रकारे हिंसक वळण लागण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. शांततापूर्ण रॅलीमध्ये काही युवक उघडपणे चाकू घेऊन वावरत होते, ही बाब पोलीस प्रशासनासाठी आणि शहराच्या सुरक्षेसाठी एक गंभीर चिंतेचा विषय ठरली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





