ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
नागपूर : राज्यात वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेले दर आणि बेरोजगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक संकटाचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत, “जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडून लक्ष हटवण्यासाठी धार्मिक आणि भावनिक मुद्द्यांचा वापर केला जात आहे,” असा आरोप केला. पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी यावर सरकारकडे कोणतीही ठोस योजना नसल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करत असतानाही सरकारकडून केवळ आश्वासनांची पूर्तता होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. शासनाने काढलेल्या जीआरची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने समाजामध्ये असंतोष वाढत असल्याचेही बोलले जात आहे.
राज्यातील अनेक भागांत पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा दिसून येत असून, इंधन टंचाई आणि दरवाढीमुळे वाहतूक क्षेत्रासह शेती व्यवसायावर परिणाम होत आहे. येत्या काही दिवसांत इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचा मोठा आर्थिक भार सामान्य नागरिकांवर पडणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने प्रभावी निर्णय घ्यावेत, अशी मागणी आता विविध स्तरातून जोर धरू लागली आहे





