Homeकोकडीकोकडी ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोप; चौकशीसाठी अधिकारी दाखल.

कोकडी ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोप; चौकशीसाठी अधिकारी दाखल.

ज्वाला न्यूज

कोकडी:

सदस्यांच्या तक्रारीवर पंचायत समितीची चौकशी; १९ ऑगस्टच्या ग्रामसभेत मागील पाच वर्षांचा संपूर्ण हिशोब सादर करण्याची मागणी.

मौजा कोकडी येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामपंचायत सदस्य तसेच काही ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. सरपंच केवळराम टिकले आणि ग्रामसेविका अपूर्वा नन्नावरे यांनी पदाचा कथित दुरुपयोग करून आर्थिक अनियमितता केली तसेच ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

 

या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. त्यानुसार यशवंत लाडे, विस्तार अधिकारी (पंचायत), वडसा आणि विजय मुळकलवार, विस्तार अधिकारी (आरोग्य), वडसा हे चौकशीसाठी ग्रामपंचायत कोकडी येथे दाखल झाले होते. यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

 

पाच वर्षांचा संपूर्ण हिशोब ग्रामसभेसमोर सादर करण्याची मागणी

 

गावातील काही ग्रामस्थांनी १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मागील पाच वर्षांतील ग्रामपंचायतीच्या सर्व विकासकामांचा संपूर्ण हिशोब ग्रामसभेसमोर सादर करण्याची मागणी केली होती.

 

मागील पाच वर्षांत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला विविध योजनांचा निधी, त्या निधीतून करण्यात आलेली विकासकामे, प्रत्येक कामावर झालेला खर्च, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी तसेच संबंधित लेखापरीक्षणाचा संपूर्ण अहवाल ग्रामसभेसमोर अनिवार्यपणे सादर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.

 

सदस्यांकडून विविध गंभीर आरोप ;

 

ग्रामपंचायत सदस्यांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक व्यवहारांशी संबंधित विषय सभेच्या अजेंड्यावर नमूद न करणे, इतिवृत्तातील कोरी पाने ठेवून त्यावर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेणे व त्यानंतर विषय नमूद करणे, तसेच विषयांवर चर्चा न करता परस्पर ठरावाची कार्यवाही केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

तसेच ग्रामपंचायतीला प्राप्त निधी व खर्चाचा खाते निहाय तपशील सभेसमोर न मांडणे, मंजूर कामांच्या प्रशासकीय मंजुरीबाबत माहिती न देणे आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, असेही आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.

 

साहित्य व फर्निचर खरेदी, घंटागाडी खरेदी, जिल्हा परिषद शाळेतील दुरुस्ती, पाण्याच्या कॅनची खरेदी तसेच मजुरांच्या देयकांबाबत देखील सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काही व्यवहार डिजिटल पद्धतीने न करता रोख स्वरूपात करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

 

निष्पक्ष चौकशीची ग्रामस्थांची मागणी ;

 

चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडली. तक्रारीतील सर्व मुद्द्यांची कागदपत्रांच्या आधारे सखोल व निष्पक्ष चौकशी करून अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

चौकशी निष्पक्षपणे झाली नाही, असे आढळल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिल्याचे सांगण्यात आले.

 

आता चौकशी समितीच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून, मागील पाच वर्षांचा निधी, विकासकामे, खर्च आणि लेखापरीक्षणाचा संपूर्ण हिशोब ग्रामसभेसमोर सादर केला जातो का, याकडेही ग्रामस्थांचे लक्ष आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular