ज्वाला न्यूज
गडचिरोली:
गडचिरोली–चामोर्शी मार्गावर भीषण अपघात; २९ जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले
गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या MH 06-8848 क्रमांकाच्या एसटी बसला गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास शिवणीजवळ भीषण अपघात झाला. धावत्या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्यालगत पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये तब्बल ६८ प्रवासी प्रवास करत होते. या दुर्घटनेत ३१ प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यापैकी २९ जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले.
अपघात होताच शिवणी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी प्रवाशांना मदत करण्यासह परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य केले.
या अपघातामुळे गडचिरोली–चामोर्शी मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
दरम्यान, बसचे स्टेअरिंग नेमके कोणत्या कारणामुळे लॉक झाले, बसची तांत्रिक तपासणी करण्यात आली होती का आणि अपघातास नेमकी कोणती कारणे जबाबदार आहेत, याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अपघातामागे निष्काळजीपणा किंवा तांत्रिक त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
अपघातातील जखमींची संख्या व त्यांची प्रकृती याबाबत अधिकृत माहिती संबंधित प्रशासनाकडून स्पष्ट होणे अपेक्षित आहे





