ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
नागपूर:
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तथा दीक्षाभूमीच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. राजेंद्र गवई आणि विलास गजघाटे यांना समितीतून कायमस्वरूपी पदमुक्त करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष भदंत सुरई ससाई यांनी दिली.
भदंत सुरई ससाई यांनी सांगितले की, समितीच्या कामकाजाबाबत संबंधित सदस्यांना नोटीस देण्यात आली होती. मात्र, समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने ही कारवाई करण्यात आली. दीक्षाभूमीचे पावित्र्य, प्रतिष्ठा आणि समितीची शिस्त कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, डॉ. राजेंद्र गवई यांनी या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. समितीच्या अध्यक्षांना सदस्यांना पदमुक्त करण्याचा अधिकार नसून, त्यासाठी समितीच्या बहुमताचा ठराव आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या निर्णयामुळे दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये नवा वाद निर्माण झाला असून, पुढे या प्रकरणात काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दीक्षाभूमीसारख्या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेतील या निर्णयामुळे प्रशासकीय आणि कायदेशीर चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आणि घडामोडींवर आमचे लक्ष राहील.





