ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
देसाईगंज(गडचिरोली) : शासनाकडून अधिकृतपणे रेतीघाटांचे लिलाव करण्यात आले असले तरी तालुक्यातील अनेक घाटांवर अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. विशेषतः कुरुड गावाजवळील बोडंगाव रेतीघाट परिसरात रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टर, जेसीबी आणि इतर वाहनांच्या सहाय्याने रेतीचा उपसा सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रेती उत्खननासाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळेनंतरही घाटावर मशीन सुरूच असतात. रात्री उशिरापर्यंत रेती भरून वाहतूक केली जात असून संबंधित विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे रेतीघाटालगत एका शेताच्या आडोशाला संशयास्पदरीत्या जेसीबी उभी असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास गुप्तपणे अवैध उत्खनन केले जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “ना कुणाची भीती, ना प्रशासनाचा धाक” अशा पद्धतीने सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था रेती वाहतुकीमुळे खराब होत असून धूळ, आवाज आणि वाहतुकीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच नदीपात्रातील अनियंत्रित उत्खननामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात नदीपात्र खोल झाल्याने पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अवैध रेती उत्खननाला राजकीय किंवा प्रशासकीय पाठबळ आहे का, याचीही चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





