ज्वाला न्यूज
गडचिरोली संपादक मंगेश बन्सोड
देसाईगंज व आरमोरी क्रीडा संकुलांच्या आधुनिकीकरणावर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसोबत चर्चा
वडसा, दि. ४ जून २०२६ : ग्रामीण व आदिवासी भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार रामदास मसराम यांनी कोरची व कुरखेडा येथे नवीन क्रीडा संकुल मंजूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घाटाळे यांच्यासोबत वडसा येथील जनसंपर्क कार्यालयात सविस्तर चर्चा केली.
बैठकीत कोरची व कुरखेडा तालुक्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. तसेच देसाईगंज व आरमोरी येथील विद्यमान क्रीडा संकुलांमध्ये आधुनिक क्रीडा साहित्य, प्रशिक्षण सुविधा, मैदानांचे उन्नतीकरण आणि आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याची मागणी आमदार मसराम यांनी केली.
जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घाटाळे यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
या पाठपुराव्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील युवक-युवतींना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार असून स्थानिक खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची संधी मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





