संपादक मंगेश बन्सोड
चंद्रपूर :-
नागरिकांना आरटीओ ई-चालान बाबत नेहमी सतर्कता बाळगा म्हणून आवाहन करण्यात येत असते, मात्र काहीजणांना याबाबत अजूनही कल्पना नसल्याने मोठा आर्थिक फटका बसताना दिसून येतो. अशाच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात नुकताच ‘आरटीओ ई-चालान’ चा ३४ वर्षीय तरुण बळी पडल्याची घटना उघडकीस आली आहे. व्हॉट्सअॅपवर आलेल्या आरटीओ ई-चालानच्या एपीके फाईलवर क्लिक करताच क्षणातच मोबाइल हॅंक झाला आणि मोबाइलचा संपूर्ण ताबा ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या चोरट्याकडे जाऊन बँकेच्या खात्यातील तब्बल १ लाख १४ हजार ७०० रुपये लंपास झाल्याची घटना काल शुक्रवारी उघडकीस आली. इझमान खान वय ३४ वर्ष, रा. इंदिरानगर, भद्रावती, जि. चंद्रपूर यांच्या बाबतीत सदरचा प्रकार घडलेला असून त्यांनी चंद्रपूरच्या सायबर सेलकडे अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.
भद्रावती येथील इझमान खान यांना बुधवारी त्यांच्या मोबाइलवरील व्हॉट्सअॅपवर ‘आरटीओ ई-चालान’ नामक ‘एपीके’ फाईलचा मेसेज आला. त्यांना वाटले की आपल्यावर कुठले तरी चालान आले असावे, त्यामुळे खान यांनी त्या फाईलवर क्लिक केले. फाईलवर क्लिक करताच क्षणातच मोबाइल हॅंक झाला आणि मोबाइलचा संपूर्ण ताबा हा चोरट्याकडे हस्तांतरित झाला. लागलीच सायबर चोरट्यांनी त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून पहिल्यांदा १ लाख १० हजार रुपये व नंतर ४ हजार ७०० रुपये, अशी एकूण १ लाख १४ हजार ७०० रुपयांची रक्कम काढून बँक ऑफ बडोदाच्या खात्यात वर्ग केली.पुढील तपास सायबर सेल करीत आहेत.





