ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
सोनापूर (ता. चामोर्शी) : सोनापूर येथील राजीव गांधी महाविद्यालयात शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सहा विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आजाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत सातार व जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, दोन विद्यार्थ्यांची प्रकृती तुलनेने गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व युवा जिल्हाध्यक्ष विकी खोब्रागडे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची विचारपूस केली. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याची विनंती केली. विद्यार्थ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती राज बन्सोड यांनी दिली.
यावेळी विषबाधित विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, “शाळेत पाणी पिल्यानंतर डोके दुखू लागले, चक्कर आली आणि आम्ही खाली पडलो,” अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
या घटनेबाबत आजाद समाज पार्टीने गंभीर आरोप करत म्हटले की, संबंधित शैक्षणिक संस्था ही चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजूरकर यांच्या संस्थेशी संबंधित असून, परिसरातील स्वच्छतेचा अभाव तसेच पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता न केल्यामुळे ही घटना घडल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संस्थेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पक्षाने केली आहे.
तसेच जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांनी या घटनेची तातडीने चौकशी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निष्काळजीपणा करणाऱ्या महाविद्यालयावर आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, स्वच्छता व्यवस्था आणि आरोग्यविषयक सुविधांची विशेष तपासणी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.





