ज्वाला न्यूज
गडचिरोली संपादक मंगेश बन्सोड
चामोर्शी:
चामोर्शी तालुक्यातील वेलतूरसह वाघोली, बोरगाव, कन्हेली, जयरामपूर परिसरातील रेतीघाटांवर बंदी कालावधीतही मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पोकलेन, ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने दिवस-रात्र रेतीचा उपसा सुरू असल्याने शासनाच्या महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून ते ३० सप्टेंबर या बंदी कालावधीतही रेती माफियांचे जाळे सक्रिय असून संबंधित महसूल व प्रशासनातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. वेलतूर रेतीघाट परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले असून त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, नदीपात्राचे नुकसान आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने जनतेत संतापाची भावना निर्माण झाली आहे. अवैध उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत असताना प्रशासन मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे.
प्रमुख मागण्या :
वेलतूरसह सर्व संबंधित रेतीघाटांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी.
चामोर्शी तहसीलदारांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्यांचे सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात.
याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा आझाद समाज पक्षाने दिला आहे. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे निवेदन सादर करून अवैध रेती तस्करीविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.





