संपादक मंगेश बन्सोड
१ जून २०२६ वीषारी दारू प्रकरणाचा फटका; पुणे ग्रामीण पोलिस दलातील चार जण निलंबित.
पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरातील हातभट्टीच्या विषारी दारू प्रकरणात अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढली असून या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिस दलातील चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत मुख्य आरोपी रोहेश्याम प्रजापती याच्याशी संबंधित काही पोलिस कर्मचाऱ्यांचे संपर्क असल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी आदेश जारी करून संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये दौंड उपविभागीय पोलिस कार्यालयातील एक कर्मचारी तसेच उरुळी कांचन आणि यवत पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
तपास अहवालाच्या आधारे महाराष्ट्र पोलिस अधिनियम व पोलिस नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित ठेवण्यात येणार आहे. तसेच निलंबन काळात त्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली असून दिवसातून दोन वेळा हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे विषारी दारू प्रकरणातील तपास अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





