संपादक मंगेश बन्सोड
सिरोंचा (गडचिरोली):
टेकडाताल्ला – कंबालपेठा मार्गावरील अट्टीवागू नाल्यावर गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नागरिकांनी पुकारलेले बेमुदत साखळी उपोषण अखेर यशस्वी झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची दखल घेत थेट आंदोलनकर्त्यांशी फोनवरून संवाद साधला, त्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
पुलामुळे ३० गावांचा संपर्क तुटतो
गत दीड वर्षांपासून रखडलेल्या या पुलाच्या बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली गेल्याने तब्बल ३० गावांचा संपर्क तुटतो, ज्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. याच समस्येवर त्वरित उपाययोजना व्हावी, यासाठी सिरोंचा तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू होते..
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, आंदोलनात आनंद
आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन आंदोलनकर्त्यांशी थेट फोनवरून संवाद साधला. “मी तुमचा पालकमंत्री असून तुमची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे, चिंता करू नका, पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होईल,” असे आश्वासक शब्द मुख्यमंत्र्यांनी काढले. या संवादामुळे आंदोलनस्थळी एकच जल्लोष पाहायला मिळाला. दुर्गम भागातील समस्या जाणून घेऊन थेट संवाद साधणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री असल्याची भावना व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे.
आदिवासी विकास विभागाला निधीचे आदेश
मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनेच दिली नाहीत, तर प्रशासकीय यंत्रणेला तत्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी आदिवासी विकास विभागाला त्वरित निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले असून, संबंधित अधीक्षक अभियंत्यांना पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.





