संपादक मंगेश बन्सोड
कोरची:
कोरची येथे शासकीय कामानिमित्त जात असताना समाजसेवक तसेच माजी उपसरपंच अप्रव पुरंदर भैसारे यांनी माणुसकीचे हृदयस्पर्शी उदाहरण घालून दिले. भर उन्हात रस्त्याच्या कडेला तहानेने व्याकूळ झालेले छोटे-मोठे बंदर पाहताच त्यांनी तात्काळ आपली गाडी थांबवली.
जवळच हँडपंप असला तरी मुक्या जीवांना तो चालवून पाणी काढणे शक्य नव्हते. ही बाब लक्षात येताच अप्रव भैसारे यांनी स्वतः हँडपंप चालवत बंदरांसाठी पाण्याची व्यवस्था केली. तहानलेले बंदर पाणी पिताना पाहून उपस्थितांच्याही मनाला स्पर्श झाला.
यानंतर त्यांनी गाडीत असलेले वेफर्स आणि खाऊ त्या बंदरांना दिले व काही वेळ त्यांच्यासोबत प्रेमाने घालवला. या घटनेतून मुक्या प्राण्यांप्रती त्यांचे प्रेम आणि संवेदनशीलता स्पष्टपणे दिसून आली.
यावेळी अप्रव भैसारे म्हणाले, “जंगलतोड वाढत असल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधात रस्त्यावर येत आहेत. प्रत्येकाने आपल्या परीने अशा मुक्या जीवांना मदत केली तर समाजात माणुसकी कायम जिवंत राहील.”
त्यांच्या या कृतीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, “आजही माणुसकी जपणारी माणसं समाजात आहेत,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.





