Homeमूलजुनासुर्ला अत्याचार प्रकरणाने संतापाची लाट; दोषींवर कठोर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा...

जुनासुर्ला अत्याचार प्रकरणाने संतापाची लाट; दोषींवर कठोर कारवाईची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा.

ज्वाला न्यूज

संपादक मंगेश बन्सोड

चंद्रपूर:

मूल तालुक्यातील मौजा जुनासुर्ला येथे अनुसूचित जातीच्या मादगी समाजातील महिला, लहान मुले व नागरिकांवर झालेल्या कथित अत्याचाराच्या घटनेने जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. जातीवाचक शिवीगाळ, अमानुष मारहाण, सामाजिक अपमान आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे पीडित कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी समाज बांधवांनी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले.

 

निवेदनात नमूद केल्यानुसार, किरकोळ कारणावरून गावातील काही व्यक्तींनी अनुसूचित जातीच्या नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ला केला. महिलांना, लहान मुलांना व नागरिकांना जातीवाचक अपशब्द वापरून अपमानित करण्यात आले. त्यानंतर मारहाण करून दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून, संविधानिक मूल्यांवरच घाला घालण्याचा प्रकार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

 

विशेष म्हणजे, घटनेनंतर काही आरोपींवर कारवाई झाल्याचे सांगितले जात असले तरी अनेक आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप समाज बांधवांनी केला आहे. त्यामुळे पीडित कुटुंबीयांवर दबाव टाकला जात असून, “तक्रार मागे घ्या अन्यथा गाव सोडा” अशा धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. परिणामी पीडित कुटुंब भयभीत झाले असून त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांनी घडलेल्या महाराष्ट्रात आजही अशा प्रकारच्या जातीय अत्याचाराच्या घटना घडत असल्याने सामाजिक न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संविधानाने सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार दिला असताना वंचित समाजातील नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याबद्दल समाज बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत कठोर व वाढीव कलमे लावावीत, पीडितांना संरक्षण द्यावे, तसेच जलदगतीने न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास जिल्हाभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही समाज बांधवांनी दिला.

 

निवेदन देताना विजय देवतळे, रूपचंद लाटेलवार, किशोर नरुले, लक्ष्मण मोहुर्ले, संदीप येनगंटीवार, अनिल बोटकावार, सुनील मोहुर्ले, भीमराव इटकलवार यांच्यासह मादगी समाजाचे अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

“अनुसूचित जातीवरील अत्याचार हा केवळ एका समाजाचा प्रश्न नसून संविधान, सामाजिक न्याय आणि मानवतेवरील आघात आहे. दोषींना कठोर शिक्षा आणि पीडितांना न्याय मिळाल्याशिवाय समाज स्वस्थ बसणार नाही,” अशी भावना यावेळी समाज बांधवांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular