ज्वाला न्यूज
देसाईगंज : शहरातील कुख्यात दारू विक्रेती रजनी रामचंद्र आत्राम (रा. गांधी वॉर्ड, देसाईगंज) हिला एक वर्षासाठी चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान यांनी ३ सप्टेंबर रोजी दिला.
रजनी आग्राम हिच्याविरुद्ध दारूविक्रीसह विविध गंभीर स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल असल्याचे वृत्त आहे. यापूर्वीही बेकायदेशीर कृत्य न करण्याची लेखी हमी देऊन तिला ताकीद देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही गुन्ह्यांची मालिका सुरूच राहिल्याने प्रशासनाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला.
महिला पोलिस उपनिरीक्षकावर हल्ल्याचे प्रकरण
२०२३-२४ मध्ये कारवाईसाठी गेलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षक सोनम नाईक यांच्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणात रजनी आग्राम हिला जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असून, या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील प्रलंबित असल्याचे वृत्तात नमूद आहे.
चार जिल्ह्यांच्या सीमेत प्रवेशबंदी
प्रशासनाने प्रकरणांचा विचार करून रजनी आत्राम हिला गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांच्या सीमांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तिच्या वास्तव्याच्या ठिकाणी संबंधित पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे देसाईगंज शहरातील अवैध दारूविक्रीविरोधातील प्रशासनाच्या भूमिकेला अधिक बळ मिळाले असून, अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.





