संपादक :मंगेश बन्सोड
आरमोरी (गड़चिरोली):
आरमोरी शहरात खळबळ माजवून देणाऱ्या ‘हनीट्रॅप’ आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात १५ दिवस उलटूनही मुख्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या गंभीर प्रकरणामुळे स्थानिक परिसरात संताप व्यक्त होत असून, पोलिसांच्या संथ कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून कृष्णा लाड नामक तरुणाला जाळ्यात ओढण्यात आले होते. त्यानंतर त्याच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. ही मागणी पूर्ण न झाल्याने आरोपींनी कृष्णाला बेदम मारहाण केली आणि त्याला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्याने तरुणाचा जीव वाचला असला, तरी या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण आहे.
आरोपींची पळवापळवी आणि न्यायालयीन धाव
या प्रकरणात नितीन जोथ आणि राजू अंबानी हे दोन मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. दुसरीकडे, या प्रकरणातील आरोपींनी अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर येत्या मंगळवारी सुनावणी होणार असून, आरोपी लाड यांना तात्पुरता जामीन मिळाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पोलिसांचे मौन आणि संशयाचा फेरा
इतकी गंभीर घटना घडूनही आरोपींना अटक का झाली नाही, याबाबत नागरिक विचारणा करत आहेत. या संदर्भात पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
तरुणाईला सतर्कतेचा इशारा
आरमोरी शहरात अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना आणि प्रेमसंबंधांच्या जाळ्यात अडकताना तरुणांनी अधिक सतर्क राहण्याची गरज तज्ज्ञांकडून व्य
क्त केली जात आहे.





