ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
दादापूर : दादापूर गावातील वॉर्ड २ मधील गेल्या सात ते आठ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावातील विहिरीला पाणी नसल्याने आणि पाणीपुरवठ्याचे एकमेव साधन बंद पडल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी गावात वादावादीचे प्रकारही घडत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या गंभीर समस्येबाबत ग्रामपंचायत तसेच ग्रामसेविका यशोदा पेंदोर ,सरपंच कैलास गावडे , पाणीपुरवठा विभाग कर्मचारी महेश उईके,उपसरपंच महानंदा वैद्य यांना वारंवार माहिती देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असून, पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी त्यांना दूरवर शेतातील बोअरवेलवर जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाढत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष न करता तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.





