ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
खामगाव (जि. बुलढाणा) : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शेतशिवारात सापडलेल्या शिरविरहित मृतदेहाच्या चुकीच्या तपासाचा ठपका स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. तपासातील गंभीर त्रुटी, निष्काळजीपणा आणि घाईघाईत काढलेल्या निष्कर्षांमुळे एका पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
राजुरा परिसरात आढळलेल्या शिरविरहित मृतदेह प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा एलसीबीने केला होता. तपासादरम्यान शिवानी कळमेकर हिची हत्या झाल्याचा निष्कर्ष काढून तिचे वडील बाबूराव कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांना अटक करण्यात आली होती.
एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस अंमलदार अजित रेहमान परसुवाले, एजाज रफिक खान आणि अमोल रमेश शेजोळे या चौघांची प्रथम नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यानंतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, कथित मृत शिवानी कळमेकर स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर संपूर्ण तपासाचा फज्जा उडाला आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या धक्कादायक प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून तपासातील अनेक त्रुटी समोर आल्याने संबंधितां
वर कारवाई करण्यात आली आहे.





