ज्वाला न्यूज
गडचिरोली, दि. १० : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत विषारी सापाने दंश केलेल्या ११ वर्षीय दीपिका बिलकुरासाय मडावी हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी तातडीने नागपूरला एअरलिफ्ट करण्यात आले.
मध्यरात्री विषारी सापाने आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना दंश केल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दीपिका लकडा (१२), सुष्मिता मंडल (१४) आणि अनू कोरेटी (८) या तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दीपिका मडावी (११), कविता किरंगे (१२) आणि समृद्धी नैताम (१४) या तीन विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान, दीपिका मडावी हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात येताच तिला अधिक चांगले व तातडीचे उपचार मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने तत्परतेने समन्वय साधून हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. त्यानंतर दीपिकाला एअरलिफ्ट करून नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दीपिकाच्या पुढील उपचारांसाठी नागपूरमधील वैद्यकीय यंत्रणेशीही जिल्हा प्रशासनाने समन्वय साधला असून, वैद्यकीय पथकाकडून तिच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, सहपालकमंत्री आशिष जयस्वाल हे दुपारनंतर जिल्हा दौऱ्यावर येणार असून, ते जपतलाई येथील आश्रमशाळेला भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेणार आहेत.
तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूने हळहळ
जपतलाई आश्रमशाळेतील या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





