Homeब्रम्हपुरीपावसाची दडी, धान पिके धोक्यात! तात्काळ पाणी सोडण्याच्या मागणीसाठी भाकप चा गोसेखुर्द...

पावसाची दडी, धान पिके धोक्यात! तात्काळ पाणी सोडण्याच्या मागणीसाठी भाकप चा गोसेखुर्द कार्यालयाला ‘घेरा डालो’ आंदोलन.

ज्वाला न्यूज

हप्ताभरात पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

वाढीव मोबदल्याच्या नावावर शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण केल्याचा आरोप

ब्रम्हपुरी (वार्ताहर):

चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. कडक ऊन आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे ब्रम्हपुरी परिसरातील शेतकऱ्यांची धान पिके व पळे (रोपे) करपण्याच्या मार्गावर आहेत. पाणी अभावी रोवणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत, शुक्रवार दिनांक १० जुलै २०२६ रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात सायगाटा वसाहत येथील ‘कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द उजवा कालवा विभाग’ यांच्या कार्यालयावर भव्य ‘घेरा डालो’ आंदोलन करण्यात आले.

मोबदल्याची फसवणूक आणि आर्थिक शोषण

आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाकपचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड विनोदभाऊ झोडगे पाटील यांनी प्रशासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली. सन १९८४ पासून गोसेखुर्द प्रकल्पाचे काम सुरू असून या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने अधिग्रहित करण्यात आल्या. गेल्या काही वर्षांपासून वाढीव मोबदला देण्याचे गाजर दाखवून प्रशासनाने शेतकऱ्यांकडून कागदपत्रे गोळा केली. या प्रक्रियेत शेतकऱ्यांचे २० ते ३० हजार रुपये खर्च झाले; परंतु ६ ते ७ महिने उलटूनही शेतकऱ्यांना एक दमडीही मिळाली नाही, असा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.

आंदोलनातील मुख्य मागण्या:

तात्काळ पाणी पुरवठा: पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी आटले आहे. गोसेखुर्द धरणात सध्या पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने पुढील २ ते ३ दिवसांत कालव्याद्वारे शेतीसाठी तात्काळ पाणी सोडण्यात यावे.

वाढीव मोबदला: बाधित शेतकऱ्यांना प्रशासनाने फसवणूक न करता वाढीव मोबदल्याची रक्कम त्वरित अदा करावी.

घोषणांनी परिसर दणाणला, अधिकाऱ्यांना ठणकावले

आंदोलनादरम्यान ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, गांगलवाडी, हळदा, मुडझा या परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. “गोसीखुर्दचे पाणी मिळालेच पाहिजे”, “असा कसा देत नाही – घेतल्याशिवाय राहत नाही”, “पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे”, “जय जवान, जय किसान”, “इन्कलाब जिंदाबाद” अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण कार्यालय परिसर दणाणून गेला होता.

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मा.शेख कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन आपली मागणी कशी रास्त आहे हे पटवून दिले. जर वेळेत पाणी मिळाले नाही आणि शेतमालाचे नुकसान झाले, तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला. यावर संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली असून 8 दिवसात पाणी सोडण्याचे मान्य केले असून वाढीव मोबदला रक्कम देण्यासबंधी नागपूर येथे लवकरच शेतकऱ्यानं सोबत बैठक लावण्याचे मान्य केले आहे.

महत्त्वाच्या विभागांना निवेदने सादर

समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन या आंदोलनाच्या निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे पाटबंधारे मंत्री (मुंबई), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक (नागपूर), मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता (गोसेखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूर) यांच्यासह ब्रम्हपुरीचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनाही तात्काळ व योग्य कार्यवाहीसाठी सादर करण्यात आल्या आहेत.

आता यावर प्रशासकीय पातळीवर काय पावले उचलली जातात आणि अडचणीत सापडलेल्या बळीराजाला कधी दिलासा मिळतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.यावेळी निलेश बनकर,संदीप बगमारे ,चुनिल्लाल मोटघरे, लोमेश मेश्राम,प्रमोद सातपुते , ओमप्रकाश सोनटक्के,नामदेव बोरघरे, नरेश चंद्र राऊत,शंकर राऊत,अनिल तोंडफोडे,शंकर राऊत,अमोल दामले,दीपक राऊत,शामराव मेश्राम, पुरुषोत्तम पानसे,दिलीप कनाके,शिवराम दोनाडकर,धनंजय नाकतोडे,नंदू ढोरे,मयुर दुर्गे, लोमेश पाल,प्रकाश राऊत यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular