Homeब्रम्हपुरीहिवाळी अधिवेशन गेले, पावसाळीही संपत आले; धान बोनसचा अजूनही पत्ता नाही! ...

हिवाळी अधिवेशन गेले, पावसाळीही संपत आले; धान बोनसचा अजूनही पत्ता नाही! भाकप च्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दिली तहसील कार्यालय वर धडक! एस. डी. ओ. मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन!

ज्वाला न्यूज

ब्रम्हपुरी:-

पूर्व विदर्भातील चंद्रपूर,भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अत्यंत गंभीर व संवेदनशील समस्येकडे सातत्याने केंद्र व राज्य सरकार चे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे मागील हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी २० हजार रुपये धान बोनस जाहीर केला होता. परंतु, या घोषणेला चार महिन्यांहून अधिक काळ उलटूनही आणि आता पावसाळी अधिवेशन अंतिम टप्प्यात आले तरीही, प्रत्यक्षात बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक 7 जुलै 2026 रोजी ब्रम्हपुरी तहसील कार्यालया वर धडक देत मा. उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन तातडीने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनाद्वारे महत्त्वाचे मुद्दे शासनाच्या दरबारी मांडण्यात आले:

आर्थिक संकट आणि मशागतीचा

खर्च:

पूर्व विदर्भातील हजारो कुटुंबांची अर्थव्यवस्था पूर्णपणे धानशेतीवर अवलंबून आहे. यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच खते, बियाणे, ट्रॅक्टर भाडे, इंधन आणि मजुरीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. अशा आर्थिक विवंचनेत बोनसची रक्कम वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांना पैशांची जुळवाजुळव करणे कठीण झाले आहे.

सावकारी कर्जाचा विळखा:

धान बोनसची रक्कम वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणी व मशागतीसाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, तर काहींना खाजगी सावकारांकडून चढ्या व्याजाने कर्ज घेण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकण्याची भीती निर्माण झाली आहे.

नैसर्गिक आपत्ती व बाजारातील अनिश्चितता:

अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती आणि रानटी हत्तीं, वन्य प्राण्यांचा उपद्रव यामुळे शेतकरी आधीच आर्थिकदृष्ट्या खचला आहे. त्यातच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. अशा वेळी जाहीर झालेला बोनस हाच शेतकऱ्यांसाठी मोठा आधार होता, परंतु त्याच्या अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रामीण भागात तीव्र असंतोष आहे.

‘अन्नदाता’ सुखी तरच देश सुखी या उक्तीप्रमाणे, शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. तरी पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता, जाहीर केलेला हेक्टरी २० हजार रुपयांचा धान बोनस कोणत्याही अटींशिवाय त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी अशी ठोस भूमिका शेतकरी नेते कॉम्रेड विनोद झोडगे पाटील यांनी केली.

शासनाने यावर तातडीने निर्णय न घेतल्यास, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा गर्भित इशारा कॉम्रेड झोडगेनी दिला आहे यावेळी गणेश झरकर,शिवराम दोनाडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरदादा सातपुते,मनीराम मंडपे,चेतन खोब्रागडे, चंदू मेश्राम,मदन खरवडे,निलेश बनकर, दुधराम आखरे,राखी लाडे, भाषकर पानसे, टीकाराम राऊत,देवानंद खोब्रागडे , आशिष पिलेवाण, प्रणय धोटे, नानेश्वर देशमुख, रामकृष्ण मेश्राम यासह तालुक्यातील अन्य शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular