ज्वाला न्यूज
पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. कोलकाता महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १०९ मधील तृणमूल काँग्रेसच्या नगरसेविका अनन्या बॅनर्जी यांच्या कार्यालयावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीमुळे अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कार्यालयातून कंडोमची पाकिटे, मसाज मशीन, मोठ्या प्रमाणात रोकड, तसेच स्वतंत्र मेकअप रूम आढळल्याचा दावा करण्यात आला असून या घटनेने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी सकाळी पोलिसांसह काही भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक नगरसेविकेच्या कार्यालयात पोहोचले. त्यावेळी कार्यालयात संशयास्पद वस्तू आढळल्याचा आरोप करण्यात आला. सरकारी कार्यालयात अशा वस्तू आढळल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, कार्यालयातून एक पिवळ्या रंगाची नोंदवहीही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये काही व्यक्तींची नावे आणि आर्थिक व्यवहारांची नोंद असल्याचा दावा केला जात आहे.
नोकरीच्या आमिषाने पैसे उकळल्याचा संशय
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण तेव्हा मिळाले, जेव्हा नोंदवहीत सरकारी नोकऱ्या मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती असल्याचा दावा समोर आला. काही लोकांकडून पैसे उकळल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी पोलिसांकडून अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. तपास यंत्रणा संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.
कोण आहेत अनन्या बॅनर्जी?
अनन्या बॅनर्जी या कोलकाता महानगरपालिकेतील परिचित महिला नगरसेविका आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून कार्यरत होत्या. २००० साली त्यांनी ‘मिस कलकत्ता’ किताब जिंकला होता. त्यानंतर त्यांनी मनोरंजन क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला आणि तृणमूल काँग्रेसमध्ये सक्रिय भूमिका बजावू लागल्या.
नगरसेविकेचं स्पष्टीकरण काय?
या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देताना अनन्या बॅनर्जी यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. कार्यालयाच्या चाव्या त्यांच्या ताब्यात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, कार्यालयात ठेवण्यात आलेल्या काही वस्तू ईद निमित्त गरजूंना वाटप करण्यासाठी आणलेल्या मदत साहित्याचा भाग असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, कंडोम, मसाज मशीन आणि इतर वस्तूंविषयी त्यांनी स्पष्ट उत्तर दिलेले नाही.
राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना उधाण
या घटनेनंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर तृणमूल काँग्रेसकडून हा राजकीय कट असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे कोलकात्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पोलिस तपास सुरू
पोलिसांनी कार्यालयातील साहित्य जप्त करून तपास सुरू केला आहे. आर्थिक व्यवहार, नोंदवहीतील माहिती आणि कार्यालयाचा वापर नेमका कशासाठी केला जात होता, याचा तपास करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





