ज्वाला न्यूज
अहेरी:
अहेरी नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीने स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे. या निवडणुकीत ना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचा अधिकृत उमेदवार मैदानात होता, ना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा थेट हस्तक्षेप दिसून आला. त्यामुळे लढत थेट राजे अमरीशराव आत्राम (भाजप समर्थित) गट आणि भाग्यश्री आत्राम समर्थित उमेदवार यांच्यात रंगली.
निकालात भाग्यश्री आत्राम समर्थित गटाने विजय मिळवत अहेरीच्या राजकारणात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या विजयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, जर अजय कंकडालवार गट निवडणुकीत सक्रिय झाला असता तर मतांचे विभाजन होऊन निकालाचे गणित बदलले असते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत निवडणूक दोन प्रमुख गटांमध्ये सरळ लढतीत परिवर्तित झाली आणि त्याचा फायदा भाग्यश्री आत्राम गटाला झाल्याचे बोलले जात आहे.
आता अहेरीत एकच चर्चा रंगली आहे की, काका-पुतण्याच्या राजकारणात भाग्यश्री आत्राम या निर्णायक चेहरा म्हणून उदयास येत आहेत का? तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही हेच राजकीय समीकरण कायम राहिले तर अहेरीच्या राजकारणाची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक राजकारणातील बदलते प्रवाह, आत्राम कुटुंबातील राजकीय संघर्ष आणि नव्याने उभे राहत असलेले नेतृत्व यामुळे आगामी काळात अहेरीचे राजकारण आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.





