संपादक: मंगेश बन्सोड
ब्रह्मपुरी:
शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय बालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ब्रह्मपुरी येथील देलनवाडी येथे घडली आहे. ईशान सत्यपाल आत्राम असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव असून, तो लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीमध्ये शिकत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे ईशान सकाळी ७ वाजताच्या सुमारास अंघोळ उरकून शाळेचा गणवेश परिधान करत होता. त्याच वेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो जागीच कोसळला. पालकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
ईशान केवळ अभ्यासातच नव्हे, तर खेळातही अतिशय हुशार आणि मनमिळावू स्वभावाचा होता. आपल्या लाडक्या विद्यार्थ्याच्या अशा अकाली निधनाने शाळेतील शिक्षकांना आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनामुळे संपूर्ण ब्रह्मपुरी शहरात शोककळा पसरली असून, अवघ्या १० वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ईशानच्या पश्चात त्याचे आई-वडील, भाऊ आणि मोठा आप्तपरिवार आहे.





