ज्वाला न्यूज
चरविदंड:
गट ग्रामपंचायत चरविदंड येथील मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांच्या चौकशीला बुधवारी नवे वळण मिळाले. सन 2021 ते 2026 या कालावधीत सरपंच व ग्रामसेविका यांच्या संगनमताने सुमारे ₹76 लाख 50 हजार 740 रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, याबाबत चौकशीसाठी संबंधित अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले.
चौकशी अधिकारी म्हणून ए. सी. खांडरे, कृषी विस्तार अधिकारी तसेच अमित दुरबुडे, वरिष्ठ सहाय्यक अधिकारी उपस्थित होते. चौकशीची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाले.
मात्र, चौकशीच्या दिवशी ग्रामसेविका रसिका सीडाम मॅडम रजेवर असल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित प्रकरणातील चौकशीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही आणि चौकशीची पुढील तारीख निश्चित करण्याची वेळ आली.
कार्यालयाच्या कक्षाला कुलूप — ग्रामस्थांचा सवाल
ग्रामसेविका रजेवर असताना त्यांच्या कार्यालयीन कक्षाला नेहमीप्रमाणे कुलूप लावले जाते, असा ग्रामस्थांचा दावा आहे. त्यामुळे कर्मचारी रजेवर असताना त्यांच्या कार्यालयीन कक्षाला कुलूप लावणे नियमानुसार योग्य आहे का? संबंधित शासकीय कागदपत्रे व नोंदी तपासणीसाठी उपलब्ध ठेवण्याची जबाबदारी कोणाची? असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
या बाबत संबंधित विभागाने नियम व प्रक्रिया स्पष्ट करून ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आझाद समाज पार्टीची उपस्थिती
चौकशीदरम्यान आझाद समाज पार्टीचे धर्मानंद मेश्राम (विदर्भ प्रभारी), जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हा उपाध्यक्ष चेतन काटेंगे, जिल्हा युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे आणि मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसेविका चौकशीच्या दिवशी उपस्थित नसल्याने चौकशी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील चौकशीच्या दिवशी संबंधित अधिकारी, ग्रामसेविका तसेच उपलब्ध शासकीय कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
₹76.50 लाखांच्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी निष्पक्षपणे व पारदर्शक पद्धतीने करून सत्य समोर आणावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.





