ज्वाला न्यूज
भामरागड :-
तालुक्यातील हिदूर-दोबूर मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी बॅनर आणि पत्रके टाकून पुन्हा दहशत निर्माण केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुका मुख्यालयापासून अवघ्या 8 ते 9 किमी अंतरावर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माओवाद्यांनी 26 जुलै 2026 ते 30 जुलै 2026 या कालावधीत संपूर्ण गडचिरोली जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी लढताना अनेक “सहकारी शहीद” झाल्याचा दावा करत, त्यांच्या स्मरणार्थ हा बंद पाळावा असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कंपन्यांचा वाढता शिरकाव, पोलीस ठाण्यांची वाढती संख्या आणि स्थानिकांच्या भविष्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती धोक्यात येत असल्याचा आरोपही या पत्रकातून करण्यात आला आहे. त्यामुळे जनतेने जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन माओवाद्यांनी केले असून या घटनेमुळे दुर्गम भागातील सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.
बंदचे आवाहन माओवाद्यांचे की आणखी कोणाचा हात?
काही दिवसांपूर्वी एटापल्ली तालुक्यात माओवाद्यांचे बॅनर आढळून आले होते, ज्यामध्ये सुरजागड कंपनीचा नाव न लिहिता नव्याने येणाऱ्या कंपन्याविरुद्ध इशारा देण्यात आला होता. तो प्रकार बनावट असल्याचे व त्यामागे बोगस नक्षलवादी असल्याचे पोलीस चौकशीत सिद्ध झाले असून पोलिसांनी दोघांना अटकही केली होती. त्यामुळे हिदूर-दोबूर येथील हे बॅनर खरोखरच ओरिजिनल माओवाद्यांनी लावले की त्यामागे इतर कोणाचा हात आहे, याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे.





