ज्वाला न्यूज
गोंदिया:
गोंदिया शहरातील उप प्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालय परिसरात आज, दि. 3 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4:00 वाजता मोठी दुर्घटना टळली. कार्यालयाच्या परिसरातील एक मोठे झाड अचानक कोसळून ते तेथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर पडले. झाड कोसळल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटना घडताच परिसरात काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
या घटनेनंतर परिसरातील धोकादायक व जीर्ण झाडांची तातडीने तपासणी करून आवश्यक ती छाटणी किंवा हटविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.





