ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विभागाकडून दररोज धडक कारवाया करण्यात येत असून कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. या कारवायांमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, त्यांच्या बदलीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. ग्राहक संघटनांचे म्हणणे आहे की, मुंडे यांच्या कारवायांमुळे सामान्य ग्राहकांचे हित जपले जात असून, त्यांच्यावर व्यापारी वर्गाकडून दबाव आणला जात आहे. सरकारने हा दबाव झुगारून मुंडे यांची बदली करू नये, अन्यथा राज्यभर जनजागृती व स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल.
तुकाराम मुंडे हे त्यांच्या कडक व पारदर्शक कामकाजासाठी ओळखले जातात. २१ वर्षांच्या सेवाकाळात त्यांची तब्बल २५ वेळा बदली झाल्याची नोंद आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेकदा वाद निर्माण झाले असले तरी भ्रष्टाचार व गैरव्यवहारांविरोधातील त्यांच्या भूमिकेमुळे जनतेत त्यांची सकारात्मक प्रतिमा आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागातील सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाव्य बदलीची चर्चा राज्यभर रंगू लागली आहे.





