संपादक मंगेश बन्सोड
आरमोरी (प्रतिनिधी):
आपल्याच समाजाची इतर समाजांत बदनामी करून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या एका ६० वर्षीय इसमाविरुद्ध वैरागड येथील बौद्ध समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी त्रस्त झालेल्या नागरिकांनी आरमोरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित इसमावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव रायभान भैसारे (वय ६०), रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड (मोठा मोहल्ला), वैरागड हे सध्या गडचिरोली येथे वास्तव्यास आहेत. मात्र, ते जेव्हा जेव्हा वैरागड येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येतात, तेव्हा आपल्याच समाजाबद्दल इतर समाजांत चुकीची विधाने करून बदनामी करतात, असा त्यांच्यावर आरोप आहे.
दिनांक ४ मे २०२६ रोजी संध्याकाळी, बाबुराव भैसारे यांचा स्थानिक रहिवासी आंध्रा भानारकर यांच्याशी वाद झाला. या वादादरम्यान भैसारे यांनी संपूर्ण समाजाचा उद्धार करून अवाच्य भाषेत शिवीगाळ केली.
मध्यरात्री तीन ट्रॅक्टर भरून नागरिक पोलीस ठाण्यात
भैसारे यांच्या वारंवार होणाऱ्या या कृत्यामुळे संतप्त झालेल्या वॉर्डातील महिला व पुरुषांनी बुद्ध विहारासमोर तातडीची सभा बोलावली. या सभेत भैसारे यांना बोलावून सामंजस्याने विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सुधारण्याऐवजी सभेतच पुन्हा समाजाविरोधात अपमानास्पद वक्तव्ये केली.
या प्रकारामुळे संतापलेल्या बौद्ध समाजाने एकत्रितपणे पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला. दि. ४ मे च्या मध्यरात्रीच समाज बांधव तीन ट्रॅक्टर भरून आरमोरी पोलीस स्टेशनला पोहोचले आणि भैसारे यांच्याविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली.
पोलीस कारवाई आणि तपास
तक्रार प्राप्त होताच आरमोरी पोलिसांनी तत्परता दाखवत बाबुराव भैसारे यांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
“समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि स्वतःच्याच समाजाची बदनामी करणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसणे आवश्यक आहे, म्हणूनच आम्ही कायदेशीर मार्गाने ही तक्रार केली आहे,” अशी भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे करीत आहेत.





