Homeकुरखेडाकुरखेडा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारावर नागरिकांचा सवाल; गैरव्यवहाराच्या चौकशीसह दोषींवर कारवाईची मागणी.

कुरखेडा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारावर नागरिकांचा सवाल; गैरव्यवहाराच्या चौकशीसह दोषींवर कारवाईची मागणी.

ज्वाला न्यूज 

कुरखेडा:

कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, नियमबाह्य खर्च आणि प्रशासकीय कामकाजाबाबत समस्त सुजाण नागरिकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार निवेदन सादर करून सखोल चौकशी व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. हे निवेदन दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अध्यक्षांना देण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.

 

निवेदनानुसार, कुरखेडा तालुक्यातील पुराडा, बांधगाव, चरविडांड, गुरनोली, रामाळा, पलसगड आणि गोठणगाव आदी ग्रामपंचायतींमध्ये ई-ग्रामस्वराज्य पोर्टलवरील नोंदी, १५ वा वित्त आयोग, पेसा निधी तसेच इतर शासकीय योजनांच्या निधीच्या वापराबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. नागरिकांनी या प्रकरणांची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

पुराडा ग्रामपंचायतीतील खर्चाचा मुद्दा ऐरणीवर

 

निवेदनात पुराडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच व सचिवांना २ कोटी २१ लाख ८८ हजार ९८६ रुपयांच्या कथित गैर व नियमबाह्य खर्चाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

 

नागरिकांनी पंचायत समिती कुरखेडा येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या चौकशीला पाठिंबा देत, नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यास विरोध

 

निवेदनात काही ग्रामपंचायतींमधील प्रकरणांवरून आंदोलन किंवा उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चौकशी सुरू असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याऐवजी संबंधितांनी कायदेशीर प्रक्रियेतून आपली बाजू मांडावी, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

 

दरम्यान, पंचायत समिती कुरखेडा येथील प्रशासनाचा पारदर्शक व कडक कारभार सुरू असल्याने सामान्य नागरिक, शेतकरी आणि गरीब नागरिकांना दिलासा मिळत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

 

नागरिकांनी गोठणगाव, पुराडा, सावळखेडा आदी ग्रामपंचायतींमध्ये चौकशी व लेखा आक्षेपांद्वारे गैरव्यवहार आढळल्यास संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर FIR दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

 

तसेच नियमबाह्य खर्च झालेला सार्वजनिक निधी संबंधितांकडून वसूल करावा, भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करणाऱ्या गटविकास अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने पाठबळ द्यावे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

 

“कोणत्याही राजकीय किंवा संघटनात्मक दबावाला बळी न पडता भ्रष्टाचारमुक्तीची मोहीम सुरू ठेवावी,” अशी मागणी समस्त सुजाण नागरिक, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular