वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षकासह खाजगी इसमावर गुन्हा; अल्लापल्ली वन विभागात खळबळ…
मुख्य संपादक मुनिश्वर बोरकर ज्वाला न्युज गडचिरोली
मुलचेरा (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्रात कथित खंडणीप्रकरण उघडकीस आल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू, वनरक्षक नितेश मडावी आणि खाजगी इसम प्रदीप मंडल यांनी एका खाजगी फर्निचर व्यावसायिकाकडून तब्बल तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणात पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून कारवाई केली असून खाजगी इसम प्रदीप मंडल याला रंगेहात पकडल्याने संपूर्ण प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित फर्निचर व्यवसायाशी निगडित व्यक्तीकडून वनविभागातील कारवाईची भीती दाखवून तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतल्यानंतर पडताळणी करण्यात आली. पडताळणीत मागणीची बाब स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले होते.
दरम्यान, ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारताना खाजगी इसम प्रदीप मंडल याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू आणि वनरक्षक नितेश मडावी यांची भूमिकाही तपासाच्या केंद्रस्थानी आली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
कटकू यांच्यावरील वाद पुन्हा चर्चेत..
या कारवाईनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू यांच्यावरील पूर्वीचे वादग्रस्त प्रकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कटकू हे यापूर्वी असरअली वनपरिक्षेत्रात कार्यरत असताना बांबू विक्री प्रकरणात गंभीर अनियमिततेच्या आरोपांमुळे निलंबित करण्यात आले होते. तत्कालीन उपवनसंरक्षक पूनम पाटील यांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली होती. त्यानंतरही विविध आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारी सातत्याने समोर येत असल्याची चर्चा वनवर्तुळात होती.मागील एका वर्षातच प्रमोशन म्हणुन मुलचेरा वनविभागात RFO म्हणुन आले
वनविभागातील प्रामाणिक अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन..
या कारवाईमुळे वनविभागातील प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतिमेलाही धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे. जंगलसंपत्तीचे संरक्षण, वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या विभागातील काही अधिकाऱ्यांवर खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप होणे ही चिंताजनक बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अल्लापल्ली वन विभागात धास्तीचे वातावरण…
एसीबीच्या कारवाईनंतर अल्लापल्ली वन विभागात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. विभागातील अनेक प्रलंबित प्रकरणे, आर्थिक व्यवहार आणि विविध कामकाजांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे.
सखोल चौकशीची मागणी…
या प्रकरणात केवळ एका व्यवहारापुरती चौकशी न करता संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व आर्थिक व्यवहार, जंगलोत्पादनाशी संबंधित प्रकरणे आणि तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत आहे. एसीबीच्या कारवाईमुळे वनविभागातील भ्रष्टाचाराच्या संभाव्य साखळीवर प्रकाश पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





