ज्वाला न्यूज
गडचिरोली:
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा शिवाजी लहाडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. १६ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार डॉ. लहाडे यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शासन आदेशात नमूद केल्यानुसार, पर्यवेक्षकीय जबाबदारी पार पाडताना अक्षय निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची सविस्तर विभागीय चौकशी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
आदेशानुसार, निलंबनाच्या कालावधीत डॉ. लहाडे यांचे मुख्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया राहणार असून, सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.
निलंबनाच्या कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांनुसार खासगी नोकरी, व्यापार किंवा उद्योगात सहभागी होता येणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना नियमानुसार निर्वाहभत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येणार आहेत.
ही कारवाई महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने करण्यात आली असून, सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल महादेव कुमेरिये यांनी आदेशावर डिजिटल स्वाक्षरी केली आहे.
दरम्यान, डॉ. लहाडे यांच्यावरील आरोपांची विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्याबाबतचे अंतिम निष्कर्ष स्पष्ट होतील.





