एनसीएमसी कार्ड सुविधेचा जिल्ह्यात फज्जा; ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय
गडचिरोली | ज्वाला न्यूज
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सवलतधारक प्रवाशांसाठी सुरू केलेल्या NCMC स्मार्ट कार्ड व्यवस्थेवरून गडचिरोली जिल्ह्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांकडून ₹100 रिचार्जसाठी प्रत्यक्षात ₹110 घेतले जात असल्याचा आरोप असून, कार्डमध्ये मात्र सुमारे ₹98.94 इतकीच रक्कम जमा होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
एसटीच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी १ सप्टेंबरपासून NCMC कार्डची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, कार्ड वितरण, रिचार्ज, नेटवर्क आणि तिकीट यंत्रणेतील तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
ग्रामीण प्रवाशांची मोठी अडचण
गडचिरोलीसारख्या ग्रामीण आणि दुर्गम जिल्ह्यात अनेक गावांमधील नागरिकांना कार्ड रिचार्ज करण्यासाठी आगार किंवा बसस्थानक गाठावे लागत आहे. त्यामुळे केवळ रिचार्जसाठी अतिरिक्त वेळ आणि प्रवासाचा खर्च करावा लागत असल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
पावतीचा प्रश्नही गंभीर
कार्ड रिचार्ज अथवा प्रवासादरम्यान झालेल्या व्यवहाराची स्पष्ट छापील पावती मिळत नसल्याने नेमकी किती रक्कम जमा झाली आणि किती रक्कम वजा झाली, याचा हिशोब प्रवाशांना कसा मिळणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
एसटी प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे
रिचार्जच्या रकमेत होणारी कपात नेमकी कोणत्या शुल्कापोटी केली जाते, ₹100 च्या रिचार्जसाठी अतिरिक्त रक्कम का घेतली जाते आणि प्रवाशांना व्यवहाराची पारदर्शक पावती का दिली जात नाही, याबाबत एसटी महामंडळाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
NCMC कार्ड व्यवस्था पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत सवलतधारक प्रवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी जोर धरत आहे.
➡️ आता गडचिरोलीतील प्रवाशांच्या या तक्रारीवर एसटी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले





