ज्वाला न्यूज
गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील कथित हलगर्जीपणामुळे अवघ्या आठ दिवसांत पुन्हा एका माता व नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आजाद समाज पार्टीने प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. जिल्हा महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीनंतर नाजुका राऊत यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या नवजात बाळाचाही काही वेळात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे जिल्ह्यातील आपत्कालीन उपचार व्यवस्था, रक्ताची उपलब्धता आणि प्रसूतीनंतरची वैद्यकीय सेवा याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केली आहे.
‘केवळ निलंबन करून प्रकरण दडपू नका’
दोषींवर केवळ निलंबनाची कारवाई करून प्रकरण मिटवण्याचा प्रकार थांबला पाहिजे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका राज बन्सोड यांनी मांडली.
निलंबित अधिकारी काही महिन्यांनंतर पुन्हा सेवेत येत असतील, तर आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाला आळा कसा बसेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींची किंमत सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांना जीव गमावून मोजावी लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘लोकप्रतिनिधींनी केवळ बैठका व प्रसिद्धीपुरते मर्यादित राहू नये’
गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेबाबत वारंवार गंभीर घटना घडत असताना लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे आजाद समाज पार्टीने म्हटले आहे. जनतेचे जीव जात असतील तर केवळ बैठका, फोटो आणि प्रसिद्धीपुरते मर्यादित न राहता आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी टीका पक्षाने केली.
चामोर्शी येथील जिजा सातर यांच्या मृत्यूच्या घटनेनंतरही आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, त्यानंतरही ठोस सुधारणा न झाल्याचा आरोप पक्षाने केला आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत नाजुका राऊत यांच्या मृत्यूची घटना घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘व्यवस्था सुधारली नाही तर रस्त्यावर उतरू’
आरोग्य व्यवस्था सुधारली नाही, दोषींवर फौजदारी कारवाई झाली नाही आणि जनतेच्या जीवाशी खेळ सुरूच राहिला, तर संबंधित आमदारांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा राज बन्सोड यांनी दिला.
जिजा सातर तसेच नाजुका राऊत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींची जबाबदारी निश्चित करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रसूती व आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करावे, अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे.
“जनतेला आश्वासने नकोत; सुरक्षित आणि जबाबदार आरोग्य व्यवस्था हवी. फोटो आणि रील नकोत; जनतेच्या जीवाची जबाबदारी
हवी,” अशी भूमिका पक्षाने मांडली आहे.





