ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
१९ ऑगस्टच्या आंदोलनानंतर २१ ऑगस्टला चौकशीचे आदेश; ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कोठी–कोरणार पुलिया प्रकरणी अखेर शासनाने विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. पुलियाच्या बांधकामाची गुणवत्ता, वाढीव खर्च, प्रशासकीय व तांत्रिक निर्णय तसेच संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी ही चौकशी करण्यात येणार आहे.
पुलिया कोसळल्यानंतर आजाद समाज पक्षाने सातत्याने चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी केली होती. १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षाच्या वतीने घेराव आंदोलन करण्यात आले. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी शासनाने विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले.
एसआयटीकडून पुलियाच्या बांधकामाची गुणवत्ता, तांत्रिक बाबी, संरचनात्मक क्षमता, पायाभरणी, कामाची देखरेख तसेच पुलिया कोसळण्यामागील कारणांचा तपास केला जाणार आहे. वाढीव खर्चासह प्रशासकीय व आर्थिक निर्णयांचीही तपासणी होणार आहे. समितीने ३० दिवसांत शासनाला अहवाल व शिफारशी सादर कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, “दोषींना पाठिशी घालू नये, अन्यथा पुन्हा आंदोलन छेडणार”, असा इशारा आजाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या एसआयटी चौकशीतून पुलिया दुर्घटनेमागील नेमकी कारणे आणि जबाबदार व्यक्तींची भूमिका स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





