Homeकुरखेडागाजली रे गाजली! चरविदंड ग्रामसभा गाजली ११ तासांपासून ग्रामसभा सुरू; ११...

गाजली रे गाजली! चरविदंड ग्रामसभा गाजली ११ तासांपासून ग्रामसभा सुरू; ११ वर्षांपासून नागरिकांना केवळ आश्वासने?

ज्वाला न्यूज 

कुरखेडा :

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गट ग्रामपंचायत चरविदंड येथे गुरुवारी सात गावांची संयुक्त ग्रामसभा सकाळी ११ वाजता सुरू झाली. तब्बल ११ तासांनंतरही नागरिकांचे प्रश्न अनुत्तरितच राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, प्रशासनाकडून वर्षानुवर्षे केवळ आश्वासने दिली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

ग्रामपंचायतीच्या २४ जुलै २०२६ रोजीच्या नोटीसनुसार चरविदंड येथे समाज मंदिरात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष सभा गोदामासदृश ठिकाणी घेण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. सभास्थळी धान्याच्या गोण्या व ड्रम दिसत असून, लाईट, पंखे आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

 

सात गावांतील नागरिकांची गैरसोय

 

चरविदंड, पालापुंडी, येडसकुही, हुर्यालदंड, कुमुडपार, गंगासायतोला आणि तुलाविटोला या सात गावांतील १०० हून अधिक महिला, वृद्ध, तरुण आणि नागरिक सकाळपासून सभेसाठी उपस्थित होते. उकाड्यात काही नागरिक जमिनीवर तर काही प्लास्टिकच्या खुर्च्यांवर बसून राहिल्याचे सांगण्यात आले.

 

कोरमच्या मुद्द्यावरही प्रश्नचिन्ह

 

ग्रामपंचायतीच्या एकूण सात सदस्यांपैकी सभेला केवळ तीन सदस्य उपस्थित असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामध्ये प्रशासक सरपंच भूपाल नारायण कुमारे, सदस्या रोशनी विकास कुमरे आणि सदस्या सविता बारसु तुलावी यांचा समावेश आहे. उर्वरित चार सदस्य गैरहजर असल्याने सभेच्या कोरमबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

 

सभेचे अध्यक्ष सोमाजी पांडू काटेंगे, सूचक चेतन नेवशा काटेंगे तर अनुमोदक प्रमोद रामसू कुमरे असल्याचे सांगण्यात आले. पालापुंडी येथील पो.पा. रेवता ताई कुमरे यांचीही उपस्थिती होती.

 

पाच वर्षांपासून पाणीप्रश्न; ११ वर्षांपासून बचत गटाचे आश्वासन

 

ग्रामसेविका रसिका सीडाम यांच्यासमोर नागरिकांनी पिण्याचे पाणी, महिला बचत गट, नाली सफाई, कर वसुली आणि शासकीय साधनसामग्रीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.

 

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. चार जिल्हा परिषद शाळा, दोन अंगणवाडी आणि चार मिनी अंगणवाड्यांमध्ये पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याचा आरोप आहे. तसेच महिला बचत गटासाठी गेल्या ११ वर्षांपासून आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात पूर्तता झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

याशिवाय, २०२३-२४ पासून नाली सफाई झालेली नाही, फॉगिंग मशीन दोन वर्षांपासून वापराविना पडून आहे, वेडिंग मशीन धूळ खात आहे आणि घंटागाडी अनेक महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

 

कर वसुली अपूर्ण; गावकऱ्यांनी स्वतःच्या पैशातून दिवाबत्ती

 

सातही गावांमध्ये कर वसुली पूर्ण न झाल्यामुळे गावकऱ्यांना स्वतःच्या पैशातून दिवाबत्तीची व्यवस्था करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला. ZP शाळेला क्रीडा साहित्य दिल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात साहित्य उपलब्ध नसल्याचेही नागरिकांनी मांडले.

 

ग्रामपंचायतीतील रिक्त पदे जाहिरात न देता मनमानी पद्धतीने भरल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

‘शासकीय योजना कागदावरच?’

 

१५ वा वित्त आयोग, मनरेगा आणि ५ टक्के आमदार निधी यांसारख्या योजनांचा उल्लेख ग्रामसभेच्या विषयांमध्ये असला, तरी प्रत्यक्ष गावांच्या विकासात अपेक्षित बदल दिसत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. शासकीय निधीचा योग्य वापर झाला आहे का, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

तरुणांचा इशारा — “प्रशासनाने जागे व्हावे!”

 

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे गैरहजर सदस्यांवर कारवाई, समाज मंदिरात मूलभूत सुविधा, सात गावांसाठी कायमस्वरूपी पाणी योजना, बंद घंटागाडी व फॉगिंग मशीन सुरू करणे, नाली सफाई, कर वसुलीत पारदर्शकता आणि महिला बचत गटाच्या ११ वर्षांच्या मागणीची पूर्तता करण्याची मागणी केली आहे.

 

“आम्हाला नोटीस समाज मंदिराची देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात गोदामासारख्या ठिकाणी बसवण्यात आले. सकाळी ११ वाजल्यापासून बसलो आहोत, मात्र प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. ही ग्रामसभा नसून शासनाची थट्टा आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.

 

चरविदंड गट ग्रामपंचायतीची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १,२९३ असल्याचे सांगण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 

“आम्ही तरुण आहोत. आमच्या गावांचे भविष्य पाण्यावर अवलंबून आहे. शासनाने तातडीने दखल घ्यावी; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा तरुण नागरिकांनी दिला.

 

या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, याबाबत बीडीओ कुरखेडा, जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्याची तयारी असल्याचे नागरिकांनी सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

संपादक

मुनिश्वर बोरकर
मुख्य संपादक

Mo No: 9421734792

94217347929421734792
मंगेश बन्सोड
संपादक

Mo No:- 9689490759

96894907599689490759
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular