ज्वाला न्यूज
गडचिरोली: ( झपतलाई )
जागतिक आदिवासी दिनाच्या रात्री २ वाजता कोवासे यांच्या आदिवासी आश्रमशाळेत विषारी साप चावल्याने आतापर्यंत ३ मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. व जवळपास 8 मुली ऍडमिट असल्याचे कळले.
ही घटना केवळ दुःखद नाही, तर आदिवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत शासन-प्रशासन आणि संबंधित संस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
महिला वॉर्डन रात्रीच्या वेळी उपस्थित का नव्हत्या? मुलींना सुरक्षित पलंगांची व्यवस्था न करता जमिनीवर गाद्या टाकून का झोपवले जाते? आश्रमशाळेत सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक सुरक्षा व वैद्यकीय व्यवस्था का नव्हती? विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले अधिकारी आणि संस्था व्यवस्थापन नेमके काय करत होते? असे गंभीर प्रश्न आजाद समाज पक्षाने केले आहेत.
संस्थापक आणि प्रकल्प अधिकारी वातानुकूलित कार्यालयात सुरक्षित बसून राहणार आणि आदिवासी विद्यार्थिनींना मात्र जीव मुठीत धरून राहावे लागणार, हा कोणता न्याय?
👉 या संपूर्ण घटनेची तातडीने उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांची तात्काळ जबाबदारी निश्चित करून, निष्काळजीपणा मूळे आदिवासी मुलींना जिव गमवावा लागल्याने निलंबित करण्यात यावे.
👉 आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करून सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था करण्यात यावी.
👉 सर्व आश्रमशाळांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करून सर्पदंश प्रतिबंधक उपाययोजना, स्वच्छता, संरक्षित निवास, महिला कर्मचारी आणि २४ तास आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था अनिवार्य करण्यात यावी.
आणि विश्वजित कोवासे यांच्याशी संबंधित संस्थेच्या आश्रमशाळेत ही गंभीर घटना घडली असेल, तर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर राहण्याऐवजी आपल्या संस्थेच्या शाळांकडे लक्ष देण्याची भूमिका घ्यावी, अशी आमची स्पष्ट मागणी आहे.
आदिवासी दिनाच्या दिवशीच आदिवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न ऐरणीवर येणे, ही प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी आणि चिंताजनक बाब आहे.
आदिवासी मुलांच्या जीवाशी कोणताही खेळ सहन केला जाणार नाही! मुलांना आश्रमशाळेत शिक्षणासाठी पाठवले जाते, मृत्यूच्या दारात ढकलण्यासाठी नाही! असा हल्लाबोल करत आजाद समाज पार्टी या घटनेचा तीव्र निषेध करते. दोषींवर कठोर कारवाई आणि सर्व आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील. असा राज बन्सोड जिल्हाध्यक्ष, आजाद समाज पार्टी गडचिरोली यांची मागणी आहे.





