ज्वाला न्यूज
कुरखेडा : कुरखेडा येथील विद्याभारती कॉलेजसमोरील प्रवासी बसस्थानक सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बदलले असून परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. यामुळे बसची प्रतीक्षा करणारे प्रवासी तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या गैरसोयीला सामोरे जात आहेत.
दररोज अनेक शाळकरी मुले या बसस्थानकावर बसची वाट पाहत उभी राहतात. मात्र, परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बसस्थानकाची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे, बसस्थानकासमोरच विद्याभारती कॉलेज असतानाही परिसराच्या स्वच्छतेकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत, नगरपंचायत व संबंधित प्रशासनाने तातडीने बसस्थानक परिसराची स्वच्छता करून नियमित साफसफाईची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.





