ज्वाला न्यूज
गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्यात रस्ते आणि पुलांच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याचा आरोप असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे आता अडचणीत आले आहेत. त्यांना अधीक्षक अभियंता पदावर पदोन्नती देऊन गडचिरोलीतच कायम ठेवण्याच्या हालचाली सुरू होत्या, मात्र याला सामाजिक कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला असून, त्यांची जिल्ह्याबाहेर बदली (हक्कालपट्टी) करण्याची मागणी लावून धरली आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर यांनी एक महत्त्वाचे पत्र जारी केले आहे. सामाजिक कार्यकर्ते अरविंद केशवराव कात्रटवार यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नेमके काय आहे प्रकरण?
कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या कार्यकाळातील रस्ते व पुलांच्या कामाबाबत तक्रारकर्त्यांनी वेळोवेळी पुरावे सादर केले आहेत. या तक्रारींच्या आधारे, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयाने गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठवले आहे. शासन निर्णय दि. ०८.०६.२०२० मधील तरतुदीनुसार, या प्रकरणाची अन्य कार्यकारी अभियंत्याकडून तात्काळ चौकशी करून, संबंधित चौकशी अहवाल आवश्यक दस्ताऐवजांसह सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे गडचिरोली बांधकाम विभागात खळबळ उडाली असून, आता चौकशी अहवालात काय निष्पन्न होते आणि प्रशासकीय स्तरावर कोणती मोठी कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





