ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
गडचिरोली :
गडचिरोली शहरातील माऊली मोबाईल शॉपमध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी तत्परतेने गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असली तरी पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 24 मे 2026 रोजी अज्ञात चोरट्यांनी माऊली मोबाईल शॉपचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी विविध कंपनींचे 09 मोबाईल हँडसेट, मोबाईल अॅक्सेसरीज तसेच रोख रक्कम असा एकूण ₹98 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी दुकान मालक अनिरुद्ध दिकोंडवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गडचिरोली येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक पुरावे गोळा केले असून संशयितांचा माग काढण्यासाठी तपास सुरू आहे.
गडचिरोली पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, संशयास्पद हालचाली किंवा संबंधित माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.





