ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
चामोर्शी: तालुक्यातील आष्टी येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. बिजन प्रधान सरकार यांच्याविरुद्ध एका तरुणीचे लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपी डॉक्टरने विवाहाचे आश्वासन देत तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर विविध ठिकाणी तसेच स्वतःच्या दवाखान्यात तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र नंतर लग्नास नकार दिल्याने पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बिजन सरकार हे गेल्या तीन वर्षांपासून आष्टी येथे नमिता हॉस्पिटल नावाने दवाखाना चालवत होते. ते मूळचे पुष्पनगर, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.





