संपादक मंगेश बन्सोड
गडचिरोली प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा रुग्णालय हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पाहायला मिळत असूनही मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात केवळ मोठ मोठ्या खरेदी करण्याच्या का मीमात गुंतलेले प्रशासन रुग्णांना वाचविण्यासाठी आहे कि दवाखान्याला ‘गॅस चेंबर’ बनवून जिवंत रुग्णांना मारण्यासाठी आहे, असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती निर्माण झाली असून किमान रुग्णालय प्रशासन तरी जिवंत आहे का? असा जळजळीत सवाल आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केला आहे.
आज सकाळी आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड हे काही रुग्णांना भेट देण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील ‘कॅज्युलटी’ वार्डात गेले असता त्यांच्या लक्षात आले की या वार्डात असलेल्या सहाच्या सहाही एसी बंद असून रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाच नव्हे तर तिथे राऊंडवर येणाऱ्या डाॅक्टरांनाही पाच – दहा मिनिटे थांबता येईल अशी स्थिती नसतांनाही रुग्णालय प्रशासन दखल का घेत नाही. दोन दिवसांपूर्वी या वार्डातील एकाच दिवशी तीन रुग्ण दगावले होते, ते या वार्डातील ‘ गॅस चेंबर ‘ स्थितीमुळेच तर नाही ना? अशी शंका यावी अशी स्थिती असल्याने त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित नसल्याने त्यांची भेट होवू शकली नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराला जिल्हाधिकारी लगाम न घालता ‘रामभरोसे’ सोडणार असतील तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील बेलगाम कारभाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करु असा इशाराही आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी प्रशासनाला दिला आहे.





