कुरखेडा :
कुरखेडा तालुक्यातील गुरनोली ग्रामपंचायत अंतर्गत टेकडोटोला येथे कपडे वाळविताना विजेचा जोरदार धक्का लागून 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. 5) दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत महिलेचे नाव प्रमा दिनकर मडकाम (वय 45) असे असून त्या नेहमीप्रमाणे घराशेजारी असलेल्या सार्वजनिक वीज खांबाच्या आधारासाठी बांधलेल्या तारेवर कपडे वाळवत होत्या. त्याचवेळी त्या तारेमध्ये विद्युत प्रवाह आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की त्या गंभीर जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने चारचाकी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे मडकाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पती व एक मुलगा असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.





