ज्वाला न्यूज
गडचिरोली, दि. १० जून २०२६ : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित व जनहिताच्या प्रश्नांसंदर्भात आमदार रामदास मसराम यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व संबंधित विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
यावेळी आमदार मसराम यांनी रेल्वे संदर्भातील प्रलंबित प्रश्नांवर विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी केली. तसेच रेल्वे प्रकल्पामध्ये झालेल्या कथित अवैध उत्खननाची, विशेषतः वर्ग-२ जमिनीतील उत्खननाची चौकशी करण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मका व धानाची तातडीने उचल करण्यात यावी, तसेच मका व धान खरेदीसाठी आवश्यक गोदामांची उपलब्धता करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. कुरखेडा येथील मका खरेदी केंद्रावर अतिरिक्त मका खरेदी होत असल्याच्या तक्रारींची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
याशिवाय आरमोरी विधानसभा क्षेत्रातील नगर परिषदांमध्ये नियमित मुख्याधिकारी नियुक्त करणे, पांदन रस्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे तसेच गोंदिया-गोरेगाव-सडक अर्जुनी-वडसा मार्गावरील जड वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी आमदार मसराम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विषयांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आमदार रामदासजी मसराम यांनी दिली.





