यवतमाळ: चक्क कार्यरत पोलिस कर्मचारी महिलेला त्रास देणार्या यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यातील ‘एएसआय’वर रविवारी (ता. 26) लोहारा पोलिस ठाण्यात विशाखा समितीच्या अहवालावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय राठोड (वय 54, रा. सुभाष नगर, यवतमाळ), असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. पोलिस विभागाला काळीमा फासणार्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.
प्राप्त माहितीनुसार पोलिस विभागात कार्यरत एका महिलेला आरोपी साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय राठोड याने प्रचंड त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कर्मचारी महिलेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न आरोपीकडून केल्या जात होता. त्या महिलेसोबत जवळीक साधण्याचा वारंवार प्रयत्न केला.
तसेच कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने स्पर्श करणे, तसेच तक्रारकर्त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. सातत्याने होणार्या या त्रासाला कंटाळून महिलेने थेट विशाखा समितीकडे लेखी तक्रार केली होती. दिलेल्या तक्रारीवरून विशाखा समितीच्या वतीने चौकशी केली असता, हे कृत्य उघडकीस आले.
दरम्यान, विशाखा समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारावर रविवारी लोहारा पोलिस ठाण्यात यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय राठोड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास लोहारा ठाणेदार रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे. या विक्षिप्त घटनेने पोलिस विभागाचे लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहे.





