ज्वाला न्यूज
गडचिरोली:
आझाद समाज पार्टी (काशीराम) गडचिरोलीचे जिल्हा प्रभारी विनोद गुरुदास मडावी यांनी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड व कोनसरी औद्योगिक/खनन प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय समस्यांकडे लक्ष वेधत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB), नवी दिल्ली येथे सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनावर 31 जुलै 2026 रोजी CPCB कार्यालयाने प्राप्तीची नोंद घेतली आहे. निवेदनात औद्योगिक सांडपाणी व्यवस्थापन, नद्या व जलस्रोतांचे संरक्षण, पर्यावरणीय नियमांचे पालन, तसेच स्थानिक आदिवासींचे आरोग्य, उपजीविका व पर्यावरणीय हक्कांचे संरक्षण यासंदर्भात तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
विनोद मडावी यांनी आपल्या निवेदनात औद्योगिक सांडपाण्याची स्वतंत्र वैज्ञानिक तपासणी, ETP (Effluent Treatment Plant) आणि Zero Liquid Discharge (ZLD) प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, पाणी गुणवत्तेची नियमित तपासणी, ऑनलाईन प्रदूषण निरीक्षण प्रणाली (OCEMS) सार्वजनिक करणे, तसेच CPCB आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांच्या संयुक्त तपासणीची मागणी केली आहे. याशिवाय, पर्यावरणीय मंजुरीतील अटींचे कठोर पालन, स्थानिक ग्रामसभा व नागरिकांचा सहभाग, तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
विनोद मडावी यांनी सांगितले की, “गडचिरोलीचा विकास हा पर्यावरण, जंगल, नद्या आणि आदिवासी समाजाच्या जीवनाशी तडजोड करून होऊ नये. शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण या दोन्हींचा समतोल राखणे अत्यावश्यक आहे.”
या निवेदनामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पर्यावरणीय प्रश्न राष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून, CPCB याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कारवाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.





